Best Moral Stories In Marathi 2023 | बोध कथा मराठीत

Rate this post

Moral Stories In Marathi – ह्या ब्लॉग मध्ये आपण Marathi Story ,Moral Stories In Marathi खूप चांगल्या रित्या सांगितल्या आहेत . तुम्ही एकदा पहा तुम्हाला नक्कीच आवडतील.

Moral Stories In Marathi | नक्कल करणे वाईट

एका डोंगराच्या उंच टोकावर गरुडांची वस्ती होती. डोंगराच्या पायथ्याला एक मोठे झाड होते. झाडावर एक कावळा आपलं घरटं बनवून रहात होता. तो खूप चतुर होता. कष्ट न करता अन्न मिळो, अशी त्याची इच्छा असायची.

झाडाजवळच्या बिळात ससे रहात होते. जेव्हा ससे बाहेर येत तेव्हा गरुड जोरात झेप घेत आणि एकाच प्रयत्नात सशाला उचलून नेत आणि मजेने खात. कावळा जेव्हा हे बघत असे तेव्हा त्याच्या तोंडाला पाणी सुटायचे. एके दिवशी कावळ्याने विचार केला की, हे चपळ ससे माझ्या हाती येणार नाहीत. त्यांचे मऊ मांस मला खायचे असेल तर मलापण गरुडासारखे करायला हवे. एकदम एका फटक्यात त्यांना पकडायचे.

दुसऱ्या दिवशी कावळ्याने ससा पकडण्याचा विचार केला आणि झाडावरून उंच झेप घेत आकाशात उंच उडत गेला. मग त्याने सशाला पकडायचे म्हणून गरुडाप्रमाणे जोरात खाली झेप घेतली. आता कावळाच तो, तो काय गरुडाची बरोबरी करणार? सशाने कावळ्याला बघितले आणि तो पटकन् एका मोठ्या दगडाच्या मागे जाऊन लपला. कावळा आपल्याच जोराच्या वेगाने जाऊन त्या दगडाला धडकला. परिणाम, त्याची चोच आणि मान तुटली. कावळ्याने तेथेच तडफडून प्राण सोडले.

Moral Stories In Marathi | सौंदर्य मोठे की उपयुक्तता ?

एक मोर होता. त्याला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. तो नेहमी स्वतःच्या सौंदर्याचे गुणगान करी, रोज नदीच्या कडेला जायचा व पाण्यात स्वत:चे प्रतिबिब पाहून तो म्हणायचा. “जरा माझी शेपटी तर पहा, माझे पंख तर पहा, किती छान आहेत. मी जंगलातल्या सगळ्या पक्ष्यांपेक्षा सुंदर आहे.”

आणि हंसाचा अपमान करीत म्हणाला, “किती रंगहीन पक्षी आहेस तू! तुझे पंख तर एकदम एक दिवस मोराला नदीच्या कडेला एक हंस दिसला. त्याने हंसाला पाहून तोंड फिरवले साधे आणि फिक्के आहेत. शरीराचा रंगपण आकर्षक नाही. एकदम धुतलेल्या कपड्यांप्रमाणे तू दिसतोस.”

हंस म्हणाला, “माझ्या मित्रा! तुझे पंख तर खरंच खूप सुंदर आणि छान आहेत. सौंदर्य म्हणजेच सगळे काही नसते, आपली उपयुक्तता महत्त्वाची असते. तू तुझ्या पंखांनी आकाशात माझ्यापेक्षा उंच उडू शकत नाहीस. मी उंच उडू शकतो. बघ…” असे म्हणून हंस आकाशात उडून गेला. मोर जमिनीवर उभा राहून त्याला बघतच राहिला. मोराला कळाले की कुठलीही गोष्ट. फक्त सुंदर नाही तर उपयुक्त असणे गरजेचे आहे.

Marathi Story | चांगला कामगार

एक कामगार खडकाचे छोटे छोटे तुकडे करत असे, तो खूप कष्टाळू आणि इमानदार होता. दिवसभर काम करून जे पैसे मिळतील त्यांतूनच सर्व भागवत असे, तो भगवान शंकरांचा भक्त होता, कामातून वेळ मिळाला की तो पूजा करत असे, एकदा संध्याकाळी तो कामावरून आला आणि जेवण करून देवाचे स्मरण करून झोपी गेला, स्वप्नात भगवंताने त्याला दर्शन दिले आणि म्हणाले, “मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाली आहे. तुला जे पाहिजे ते माग.”

कामगार म्हणाला, “देवा मला एक डेरेदार झाड बनवा.” देवाने त्याला सावली देणारे सुंदर झाड बनवले,
थोड्या वेळाने सूर्याच्या उष्णतेमुळे झाडाची पाने गळून पडली, ते झाड निष्पर्ण झाले, मन त्याला वाटले सूर्य खूप शक्तिशाली आहे. त्याने देवाची प्रार्थना केली, “देवा मला सूर्य बनव,” सूर्य होऊन तो चमकू लागला.

एवढ्यात एका मोठ्या ढगामुळे तो झाकोळला गेला. सूर्याला वाटले, ढग जास्त शक्तिशाली आहे. त्याने पुन्हा देवाची प्रार्थना केली. देवा मला ढग बनवा. तेव्हा हवा जोरात सुटली ढग इकडे-तिकडे पळू लागले, ढगाला वाटले की ढग हवेपेक्षा कमजोर आहे.

पुन्हा देवाला म्हणाला, “मला हवा बनवा.” हवा बनून तो आकाशात मस्त फिरू लागला. एवढ्यात रस्त्यात फिरताना विशाल पर्वत आले आणि ती थांबला. त्याला वाटले पर्वत हवेपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. त्याने देवाला प्रार्थना केली, पर्वत बनव, देवाने त्याला पर्वत केले. एवढ्यात त्याच्या पायथ्याला वेदना होऊ लागल्या. त्याला पायात टोचू लागले.

खाली वाकून त्याने पाहिले, एक कामगार हातोडीचे घाव घालत आहे. हे पाहून त्याला वाटले की पर्वतापेक्षा कामगार शक्तिशाली आहे. आता त्याचे डोळे उघडले, कोणी तरी म्हटले आहे की “देवाने ज्याला जे काम दिले ते काम माणसाने संपूर्ण निष्ठेने केले पाहिजे, जो माणूस दुसऱ्याची बरोबरी करतो, तो स्वत:च्या कामाला गमावतो. दुसऱ्यांशी स्पर्धा करणारे नेहमी दुःखी असतात, तर दुसऱ्यांना मदत करणारे नेहमी सुखी असतात.

Marathi Story | समजूतदार शेतकरी

एक शेतकरी होता. त्याला एक नदी पार करायची होती. त्याच्याजवळ एक सिंह, एक गवताची पेंढी आणि बकरी होती. नदी पार करण्यासाठी नदीकिनाऱ्यावर एक होडी होती. त्या होडीमध्ये एका वेळेस फक्त दोघेचजण जाऊ शकत होते. नाहीतर होडी बुडण्याचा धोका होता.शेतकऱ्याला प्रश्न पडला की आता, ‘काय करू ? जर मी पहिल्यांदा सिंहाला नेले तर पाठीमागे बकरी सगळी गवताची पेंडी खाऊन टाकेल आणि जर गवताची पेंडी घेऊन जाऊ तर पाठ फिरवताच सिंह बकरीला खाऊन टाकेल.

बकरीला पहिल्यांदा घेऊन जाणे ठीक आहे. बकरीला दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून परत सिंहाला घेऊन जाईन. परत सिंहाला तिथे सोडले तर अरे… अरे…मग तिथेपण सिंह बकरीला खाऊन टाकील. जर गवताची पेंढी घेऊन जाईन तर सिंहाला घेण्यासाठी येईन तेव्हा बकरी गवताची पेंढी खाऊन टाकणार. आता काय करावे?’ शेतकऱ्यापुढे पुन्हा तोच प्रश्न आला. शेतकरी हताश झाला. पण तो खूप समजूतदार होता.

विचार करता-करता त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. शेतकरी पहिल्यांदा बकरीला घेऊन गेला. बकरीला दुसऱ्या किनाऱ्यावर सोडले. मग परत येऊन सिंहाला घेऊन गेला. सिंहाला तिथे सोडले आणि बकरीला परत घेऊन आला. मग बकरीला पहिल्या किनाऱ्यावर ठेवले आणि गवताची पेंढी घेऊन गेला. गवताची पेंढी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सिंहाजवळ ठेवली आणि परत पहिल्या किनाऱ्यावर आला.

मग बकरीला दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन गेला. अशा प्रकारे त्या शेतकऱ्याने कोणतेही नुकसान न होऊ देता
नदी पार केली आणि मोठ्या आनंदाने आपल्या घरी गेला.

हे सुद्धा वाचाMarathi Story

Marathi Story | उपद्रवी माकड

एका शहरात एक घर बांधण्याचे काम चालू होते. तिथे लाकूड काम चालले होते. एके दिवशी एक कारागीर एक जाड ओंडका करवतीने कापत होता. त्याला त्या ओंडक्याचे दोन तुकडे करायचे होते. त्याच कामात त्याला दुपार झाली. पण ते लाकूड तो पूर्ण कापू शकला नाही.

एवढ्यात दुपारच्या जेवणाची वेळ झाली. आता त्या कारागिराने काम बंद केले. त्यामुळे त्याने लाकडाच्या कापलेल्या भागात एक जाड वस्तू म्हणजे पाचर अडकवून ठेवली. त्यानंतर तो जेवायला निघून गेला. काही वेळाने तिथे माकडांचा एक कळप आला आणि दंगा करू लागला. त्या दंगेखोर माकडांत एक महादंगेखोर माकड होते. ते कायम उलट-सुलट काम करत असे.

त्या कळपातले एक माकड त्याला समजावून सांगायचे. पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नव्हता. त्या माकडांच्या कळपात त्याची म्हातारी आजी होती. ती आजी त्याला समजावत होती की, तुझे आई वडील या जगात नाहीत. तूच माझ्या म्हातारपणाची काठी आहेस. त्यामुळे दंगा करू नकोस. जर तुला काय झाले तर मी कोणाच्या आधारावर जगू?

आजीचे बोलणे ऐकून तो काही दिवसच व्यवस्थित वागायचा पण परत त्याची जुनी सवय सुरू व्हायची. बांधकामाच्या ठिकाणी तो अशाच खोड्या करू लागला. महादंगेखोर माकड लाकूडतोड्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सगळे काम उद्ध्वस्त करू लागले. तो काही वेळ इकडे-तिकडे पाहू लागला. त्याची नजर लाकडाला अडकविलेल्या पाचरीवर पडली.

तो त्या पाचरीजवळ गेला आणि तिला हातात पकडून हलवू लागला. पण त्या वस्तूला काहीच झाले नाही. असे करताना पाहून त्याला एक म्हातारे माकड ओरडले. परंतु, त्या माकडाने मनात ठरवले की, ती लाकडात अडकवलेली वस्तू काढायचीच. तो आपले दोन्ही पाय लाकडावर ठेवून बसला.

त्याच्या या अशा बसण्याने त्याची शेपटी लाकडाच्या कापलेल्या रिकाम्या भागात गेली. आता तो त्या अडकवलेल्या पाचरीला जोरजोरात हलवू लागला. सारखे-सारखे हलवण्याने ती पाचर थोडी-थोडी बाहेर निघायला लागली. जेव्हा थोडी निघायची राहिली तेव्हा माकड जोर लावून बाहेर ओढायला लागला. जशी पाचर बाहेर निघाली तसे ते लाकडाचे दोन कापलेले भाग एकमेकांना चिकटले.

माकडाची शेपटी त्यात अडकली गेली. माकड जोरजोरात ओरडू लागले. त्याला लाकूडतोड्याची भीतीसुद्धा सतावत होती. त्याला माहित होते की लाकूडतोड्या आला तर त्याचे झालेले नुकसान पाहून तो त्याला खूप मारणार. तो शेपटी काढण्यासाठी झटापट करू लागला. त्याने जोर लावून जशी शेपटी ओढली तशी त्याची शेपटी तुटली. तो जोरात पळत झाडावर चढला आणि तुटलेली शेपूट पाहून रडू लागला.

हे सुद्धा Youtube वर बघा – Moral Stories In Marathi

निष्कर्ष –

Moral Stories In Marathi अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचन आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला Marathi story , Moral Stories In Marathi कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल …आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Leave a Comment